नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात यंदा वायव्य भारताच्या काही भागातून ६ ऑक्टोबरपासून नैऋत्य मौसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरु होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. नैऋत्य मौसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाच्यादृष्टीनं अरबी समुद्रात अनुकुल परिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिली. ते काल नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलत होते. यंदाच्या नैऋत्य मौसमी पावसात देशात सरासरी ८७४ पूर्णांक ६ मिली मीटर इतका पाऊस झाल्याची माहितीही भारतीय हवामान विभागानं दिली आहे. हे प्रमाण सरासरीपेक्षा एका टक्कानं कमी आहे. मात्र त्याचवेळी महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १९ टक्के जास्त पाऊस झाल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे.