नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा करापोटी सप्टेंबरमधे 1 लाख 17 हजार 10 कोटी रुपये महसूल गोळा झाला. त्यातला 20 हजार 578 कोटी रुपये केंद्रीय कर होता तर राज्यांचा वाटा 26 हजार 767 कोटी रुपये होता. एकात्मिक वस्तू आणि सेवा करापोटी 60 हजार 911 रुपयांचा महसूल गोळा झाला आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत ही वसुली 23 टक्क्यांनी जास्त आहे. आयात मालावरच्या करवसुलीत 30 टक्के तर देशांतर्गत व्यवहार आणि आयात सेवांवरच्या कर वसुलीत 20 टक्के वाढ नोंदवली गेली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मिळालेल्या GST महसुलापेक्षा दुसऱ्या तिमाहीत सरासरी दरमहा वसुली 5 टक्के वाढली. पहिल्या तिमाहीत सरासरी दरमहा वसुली 1 लाख 10 हजार कोटी रुपये होती तर दुसऱ्या तिमाहीत ती 1 लाख 15 कोटी रुपये झाली. देशाची अर्थव्यवस्था वेगाने सावरत असल्याचं हे निदर्शक आहे.