नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील १२ ते १८ वर्षांच्या मुलांच्या लसीकरण मोहिमेत, सहव्याधी असलेल्या मुलांचे लसीकरण प्रथम करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानंतर निरोगी मुलांचे लसीकरण करण्यात येईल असं राष्ट्रीय लसीकरण सल्लागार गटाचे अध्यक्ष डॉ एन के अरोरा यांनी म्हटलं आहे. सध्या अशा सहव्याधी असलेल्या मुलांची यादी करण्याचं काम सुरु असून ती लवकरच जनतेला उपलब्ध होईल असं ते म्हणाले. गंभीररित्या आजारी असलेल्या मुलांना लस घेण्यासाठी जास्त प्रवास करावा लागू नये, यासाठी त्यांची लसीकरण नोंदणी त्यांच्या घराजवळच्या केंद्रात करण्याची काळजी घेतली जाईल, असं ते म्हणाले. भारतीय औषध महानियंत्रकांनी ऑगस्ट मध्ये झायडस कॅडीला या कंपनीने तयार केलेल्या डी एन ए लसीला १२ वर्षावरच्या मुलांसाठी व मोठ्यांसाठी आपत्कालीन वापराची मंजुरी दिली आहे.