मुंबई (वृत्तसंस्था) : एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्यांबाबत शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असून सध्या अहस्तांतरणीय असलेला चित्रपटगृह परवाना हस्तांतरणीय आणि व्यापारक्षम करावा आणि ही प्रक्रिया सुलभ करावी असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी काल दिले. एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्यांबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर मुख्य सचिव गृह मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव अपील, सुरक्षा, आनंद लिमये, पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, माजी खासदार अशोक मोहोळ आदी उपस्थित होते. कोरोना कालावधीत बंद असलेल्या एक पडदा चित्रपटगृहांना सेवा शुल्कासंदर्भातील मागणीवर सकारात्मक निर्णय घेणे आणि कर शुल्क माफ असलेल्या चित्रपटांवरील राज्य वस्तु आणि सेवा कराचा शासनाकडून परतावा देणे, यासाठी वित्तमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. चित्रपटगृहे पुन्हा सुरू करताना मागील वर्षाचा परवाना नूतनीकरण कालावधी वाढवून देण्याच्या मागणीला गृहमंत्र्यांनी मंजुरी दिली.