नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमायक्रोन कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तित प्रकारच्या विषाणू संसर्गाचा रुग्ण मुंबईत सापडल्याने चिंता वाढलेली असताना धारावीसारख्या गजबजलेल्या झोपडपट्टीत टांझानिया येथून आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने चिंतेत भर पडली आहे. या रुग्णाच्या जनुकीय अनुक्रम निर्धारण चाचणी अहवाल आल्यानंतर त्याला ओमायक्रोनची लागण झाली आहे का हे स्पष्ट होईल. या रुग्णावर पालिकेच्या सेव्हनहिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध युद्धपातळीवर घेतला जात असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचे उपाय घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबई विमानतळावर आलेल्या परदेशी प्रवाशांचा शोध घेऊन त्यांच्या कोरोना चाचण्या केल्या जात असून आतापर्यंत २ हजार ७९४ परदेशी प्रवाशांच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी १३ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.