मुंबई (वृत्तसंस्था) : सुप्रसिद्ध लेखक आणि  समाजसेवक डॉ. अनिल अवचट ह्यांचं आज सकाळी पुणे इथल्या राहत्या घरी दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. त्यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या अशा दुर्लक्षित घटकांच्या  प्रश्नांविषयी विपुल लिखाण केलं आहे. डॉ. अनिल अवचट यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. इथे वापरली जाणारी व्यसनमुक्तीची अनोखी पद्धत ही जगभरातल्या  अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते. आतापर्यंत त्यांची २२ पुस्तके प्रकाशित झाली असून राज्य आणि देशपातळीवरच्या अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी कोणत्याही धार्मिक विधीशिवाय अंतिम संस्कार केले जातील. आज आपल्यातून  सेवाव्रती सामाजिक कार्यकर्ता, मनस्वी साहित्यिक आणि हाडाचा पत्रकार असं बहुआयामी व्यक्तिमत्त्व निघून गेलं आहे, हे  क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.  अवचटांचं चौफेर लेखन आणि सामाजिक कार्य हे पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असे आहे. त्यांचं  हे योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. बहुआयामी जीवन समरसून जगणाऱ्या हरहुन्नरी डॉ. अनिल अवचट यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक चळवळीची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी  श्रध्दांजली वाहिली आहे.