नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जगभरात जागतिक रेडिओ दिवस साजरा केला जात आहे. आज एफएम रेनबो वाहिनीवर सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत आकाशवाणी-दिल्ली, ‘सात तास टॉकथॉन’ प्रसारित करत आहे. ‘टॉकथॉन’ चा एक भाग म्हणून, आकाशवाणीनं आज सकाळी एफएम रेनबो वाहिनीवर अर्धा तास ओपन फोरम आयोजित केला. आकाशवाणीचे प्रधान महासंचालक एन. वेणुधर रेड्डी यांनी श्रोत्यांशी “आकाशवाणीची विश्वासार्हता” या विषयावर संवाद साधला.

आकाशवाणीनं अनेक दशकांपासून आपली विश्वासार्हता जपली आहे, आणि त्याचं श्रेय प्रसारकांच्या पिढीला, माईकच्या मागं असलेल्या निवेदकांना तसंच बातमीपत्रं तयार करणाऱ्यांना जातं. या वर्षी जानेवारीमध्ये आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सनं माध्यम संस्थांच्या विश्वासार्हतेबाबत सर्वेक्षण केलं होतं. त्या सर्वेक्षणात आकाशवाणी अग्रस्थानी होती, असं टॉकेथॉनमध्ये बोलताना रेड्डी यांनी सांगितलं.

साथीच्या काळात काय करावं आणि काय करू नये यावर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारची चर्चा आकाशवाणीनं घेतली. आकाशवाणीनं विविध भाषांमध्ये महामारीच्या काळात दररोज विश्वसनीय आणि विश्वासार्ह माहिती, आणि तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन प्रसारित केलं. आकाशवाणी भारतीय कुटुंबांचा पिढ्यानपिढ्या भाग आहे,असं रेड्डी यांनी सांगितलं.

टॉकेथॉनमध्ये बोलताना आकाशवाणीच्या वृत्तसेवा विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. अतुल कुमार तिवारी म्हणाले की, ऑल इंडिया रेडिओनं लोकांचा विश्वास कायम ठेवला आहे. ४६ प्रादेशिक वृत्त विभाग आणि २०० अर्धवेळ वार्ताहर, परदेशी वार्ताहर आकाशवाणीसाठी काम करतात आणि बातमीपत्रांसाठी माहिती देतात. आकाशवाणीचं प्रसारण १७ परदेशी भाषांमध्येही होतं. पूर्वी आकाशवाणी मध्यम लहरी आणि लघु लहरींवर होती आणि आता ती मोबाइल ॲप, यूट्यूब, ट्विटर आणि पॉडकास्ट यांसारख्या अनेक डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे, असं तिवारी यांनी सांगितलं.