मुंबई (वृत्तसंस्था) : दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला-पूर्णा या लोहमार्गावर, लोहगड ते वाशिम दरम्यान विजेवर चालणाऱ्या रेल्वेची काल यशस्वी चाचणी झाली. हा टप्पा ५४ किलोमीटरचा आहे. त्याच्या विद्युतीकरणाचं काम नुकतंच पूर्ण झालं होतं. अकोला-पूर्णा हा लोहमार्ग एकूण २५० किलोमीटरचा आहे. याआधी या मार्गावर अकोला ते लोहगड या ३८ किलोमीटरच्या टप्प्याचं विद्युतीकरण पूर्ण झालं होतं. आता वाशिम ते पूर्णा हा टप्पा लवकरच पूर्ण केला जाईल असं दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनानं कळवलं आहे. या संपूर्ण मार्गाच्या विद्युतीकरणामुळे उत्तर भारतातल्या दिल्ली आणि दक्षिण भारतातल्या हैदराबाद आणि इतर महत्वाच्या शहरांपर्यंतच्या प्रवासाच्या वेळेत बचत होऊ शकणार आहे.