मुंबई (वृत्तसंस्था) : पुणे-बेंगलोर महामार्गाला पर्यायी असणारा नवा ट्रॅफिक फ्री महामार्ग तीस हजार कोटी खर्चून तयार केला जाणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितलं आहे. ते आज सांगली जिल्ह्यातील भिवघाट इथं शेतकरी मेळाव्यात बोलत होते. हा महामार्ग सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी भागातून पुढे जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

परदेशात ज्या वानांना मागणी आहे अशी द्राक्ष आणि डाळिंब उत्पादित करून निर्यात केल्यास शेतकऱ्यांना डॉलरच्या प्रमाणात भाव मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांनी यापुढे, शेतीमाल आणि द्राक्ष, डाळिंब मोठ्या प्रमाणात निर्यात केलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं. देशात ध्वनी प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी नवीन कायदा लागू केला जाणार आहे. तसंच वाहनांच्या हार्नसाठी भारतीय वाद्यांचा आवाज वापरण्याची कल्पना असल्याचा पुनरुच्चार गडकरी यांनी यावेळी केला.