मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या महिलांना मदतीचा हात देण्याचं नाम फाउंडेशनचं कार्य उल्लेखनीय आहे अशा शब्दात अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. त्या आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. अकोला जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या १०९ विधवा महिलांना नाम फाउंडेशननं आर्थिक मदतीचा हात दिला आहे. यावेळी अरोरा यांच्या हस्ते २७ लाख २५ हजार रुपयांचे धनादेश महिलांना वितरित करण्यात आले.

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या पाठीशी जिल्हा प्रशासन असून संबंधित कुटुंबांना आवश्यक ती मदत करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी दिली. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना योजनांचा लाभ देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देत त्यासाठी संबंधित शेतकरी कुटुंबांनी तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन अरोरा यांनी यावेळी केलं.