मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. यासंदर्भात मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत ते आज बोलत होते.
महाराष्ट्रवासियांनी सर्व सण-उत्सव शांततेने, जातीय-धार्मिक सलोखा राखून साजरे केले पाहिजेत. आपापसातले प्रश्न सामोपचाराने, सहकार्याच्या भूमिकेतून सोडवले पाहिजेत. शांतता, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा पोलिसांवर ताण येतो, सर्वसामान्य नागरिकांना त्याची किंमत मोजावी लागते, हे लक्षात घ्यायला हवं असं ते म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयानं ध्वनीक्षेपकासंदर्भात दिलेला निर्णय सर्वांसाठी बंधनकारक असून त्यासंदर्भात केंद्र सरकार त्यांच्या तर राज्य सरकार त्यांच्या पद्धतीने अंमलबजावणी करतील. राज्याचा गृहविभाग, नियम-कायद्यानुसारंच कार्यवाही करेल. कायद्यापेक्षा वेगळी भूमिका घेणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊन, सर्वांच्या सहकार्यानं एक चांगला मार्ग निघावा, असा राज्य सरकारचा प्रयत्न आहे, असं त्यांनी सांगितलं.
या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पर्यावरणमंत्री अदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, यांच्यासह शेकाप, बहुजन विकास आघाडी, लोकभारती पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, समाजवादी पक्ष, मार्स्कवादी कम्युनिस्ट पक्ष, आरपीआय – गवई गट या पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.