नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील उत्कृष्ट युवा अधिकाऱ्यांना आकांक्षी जिल्ह्यांमध्ये तैनात केल्यास आपले नवे विचार आणि रचनात्मक कार्यपद्धतीमुळे ते या भागात ठोस बदल घडवून आणू शकतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हिमाचल प्रदेशमधील धरमशाला इथं देशातील मुख्य सचिवांच्या तीन दिवसांच्या परिषदेत अध्यक्षस्थानावरून ते काल बोलत होते. अशा स्वरुपाची ही पहिलीच परिषद असून केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारं यांच्यात मजबूत भागीदारी निर्माण व्हावी यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.

आकांक्षी जिल्ह्यांच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि या कार्यक्रमाचा विस्तार शहरं आणि ब्लॉक पातळीवर केला पाहिजे, अशी सूचना पंतप्रधानांनी यावेळी केली. डिजिटल तंत्रज्ञान आणि शिक्षण देणाऱ्या मोबाइल अॅपचा वापर करुन शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था आणखी सशक्त केली जाऊ शकते. यासाठी सेवानिवृत्त झालेल्या पुरस्कार प्राप्त शिक्षकांची मदत घेता असं त्यांनी सांगितलं. नाट्य, एकपात्री, अॅनिमेशन यासारख्या क्षेत्रात प्रादेशिक भाषांमध्ये दर्जेदार साहित्याची निर्मिती व्हावी यासाठी युवकांमध्ये स्पर्धेचं आयोजन करण्याची सूचना त्यांनी केली.