नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानमध्ये आज झालेल्या भूकंपात १३० जणांना आपला जीव गमवावा लागला. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, देशाच्या पूर्वेला रिश्टर स्केलवर ६ पूर्णांक १ तीव्रतेचा भूकंप झाला. तालिबान प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख मोहम्मद नसीम हक्कानी यांनी ही माहिती दिली. बहुतांश मृत्यू पक्तिका प्रांतात झाले आहेत. तिथं १०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आणि २५० जखमी झाले. नांगरहार आणि खोस्ट या पूर्वेकडील प्रांतांमध्येही मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं. पाकिस्तान आणि भारतात भूकंपाचे धक्के जाणवल्याचं युरोपीयन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्रानं सांगितलं.