मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या राजकीय मंचावरच्या नाट्यमय घडामोडी अद्याप निर्णायक स्थितीत पोहोचलेल्या नाहीत. शिवसेना विधीमंडळ पक्षातले बहुसंख्य आमदार आपल्या सोबत असल्यानं पुरेसं संख्याबळ असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी काल केला होता.

मात्र या गटाचे सर्व आमदार अद्याप राज्याबाहेरच आहेत. त्यानंतर आपल्या गटातल्या आमदारांची सुरक्षा महाविकास आघाडी सरकारनं काढून घेतली असल्याचं ट्विट त्यांनी केलं होतं. राज्यातल्या कोणत्याही आमदाराचं संरक्षण काढण्याचे आदेश, मुख्यमंत्री किंवा गृहविभागानं दिलेले नाहीत, असा खुलासा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे.

या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत असं त्यांनी स्पष्टं केलं आहे. राज्यातल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचं संरक्षण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी काढून घेतलं असल्याचा दावा शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट द्वारे केला होता.

बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे असही शिंदे यांनी म्हटलं होतं. दरम्यान, शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल पक्षाच्या संपर्क प्रमुखांना संबोधित केलं, आणि शिवसेना पुन्हा उभी राहील, असा विश्वास व्यक्त केला.

महाविकास आघाडीचे घटकपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला असून, सरकारचं कामकाज सुरु असल्याचं म्हटलं आहे.