मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. सोमवारी दिवसभर संततधार सुरू होती. त्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत दुपारनंतर वाढ सुरू झाली आहे. ४४ बंधारे पाण्याखाली गेले असून, पावसाने शहरासह जिल्ह्यातही जनजीवनावर परिणाम झाला. जिल्ह्यात १५ जुलैपर्यंत अतिवृष्टी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. नृसिंहवाडी येथील मंदिरात रात्री तीन वाजता चढता दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला. पुराचे पाणी गाभाऱ्यात गेले आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकं पाण्यात गेली आहे. बाभूळगाव, राळेगाव, झरीजामनी, मारेगाव, वणी या तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील पिकांना मोठा फटका बसला असून पाण्यामुळे शेतजमीन खरडून गेली आहे. यवतमाळच्या उमरखेड परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळं निंगणूर-फुलसावंगी मार्गावरचा पूल वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसंच ढाणकी, निंगणूरसह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.