मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरु असून गेले काही दिवस पडत असलेल्या  मुसळधार पावसामुळे  राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये एकूण १०२ नागरिकांच्या मृत्यूची नोंद झाली तर १८३ पशुधनाची हानी झाली. मंत्रालय नियंत्रण कक्ष राज्यातल्या सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या सातत्यानं संपर्कात असून पूरस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनानं पूर प्रवण जिल्ह्यांमध्ये NDRF आणि SDRF च्या तुकड्या तैनात केल्या आहेत. राज्याच्या काही भागात पावसाचा जोर कायम असून कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची नोंद झाली. विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.

मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये कुलाबा इथं ६२ पूर्णांक ६ मिलीमीटर तर सांताक्रूझ इथं ९५ पूर्णांक २ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रस्ते वाहतूक आणि मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरची वाहतूक सुरळीत सुरु आहे. पालघर जिल्ह्यात पावसाची स्थिती सामान्य असून जिल्ह्यातल्या ३ प्रमुख नद्या धोक्याच्या पातळी खाली वाहत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात NDRF च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात खाडीत बुडून २जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात पूरस्थिती नाही. सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत.

नांदेड जिल्ह्यातल्या बहुतेक सर्व तालुक्यांमध्ये काळ संध्याकाळपासून पावसानं विश्रांती घेतली आहे. शेतात साचलेल्या पाण्याचा निचरा जिल्ह्यातल्या धर्माबाद , बिलोली, ऊमरी, या तालुक्यांमध्ये आज हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. जिल्ह्यातल्या  बाभळी उच्च पातळी बंधाऱ्याचे ७ दरवाजे आज सकाळपासून उघडण्यात आले आहेत. त्यामधून ३१ हजार ६२३ क्यूसेस पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात केला जात आहे. जिल्ह्यातल्या अर्धापूर, मुदखेड, हिमायतनगर हदगाव, भोकर या तालुक्यांना  सिंचनासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्पात अर्थात ईसापूर धरणात ७१.१३ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

चंद्रपूर शहरातल्या पाठणपुरा गेट-आरवट मार्गावरच्या एका निवासी संकुलात काल पुराचं पाणी शिरल्यानं तीस नागरिक अडकून पडले होते. त्या नागरिकांना  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकानं आरवट इथल्या प्राथमिक शाळेत सुरक्षितपणे स्थलांतरीत केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेले सहा दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसानं आज विश्रांती घेतली. मात्र सिरोंचा इथली पूरस्थिती अद्याप कायम असून आष्टी-आलापल्ली, आष्टी-चंद्रपूर यासह  २१ प्रमुख मार्ग बंद आहेत तर शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. सिरोंचा-कालेश्वर राष्ट्रीय महामार्ग पुरामुळे खचला आहे. आतापर्यंत पूरबाधित ४९ गावांमधल्या २ हजार ७८५ कुटुंबातल्या ११ हजार ८३६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

गडचिरोली-नागपूर, आलापल्ली-भामरागड आणि गडचिरोली-चामोर्शी या मार्गांवरची वाहतूक सुरु झाली आहे. अहेरी, सिरोंचा, भामरागड, या तालुक्यांमधल्या काही अंतर्गत रस्त्यांचं  दळणवळण बंद झालं आहे. मात्र,गडचिरोली जवळच्या  पाल नदीचा पूर ओसरला आहे.  गडचिरोली-नागपूर, शिवणी नाल्याचं पाणी कमी झालं असून  गडचिरोली-चामोर्शी आणि पर्लकोटा नदीचा पूर ओसरल्यानं आलापल्ली-भामरागड हे मार्ग सुरू झाले आहेत. दरम्यान, गोसेखुर्द धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग वाढला आहे. सध्या  धरणाच्या ३३ पैकी २७ दरवाजे एक मीटरनं  तर ६ दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आले आहेत. त्यामधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पूर स्थिती नाही. मात्र जिल्ह्यातल्या खेड इथली जगबुडी नदी इशारा पातळी वरून वाहत आहे. या भागातल्या नागरिकांचं स्थलांतर केलं जात आहे. वारंवार दरडी कोसळत असल्यानं सुरक्षिततेसाठी मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटात  येत्या ३० जुलै पर्यंत सकाळी ६ ते संध्याकाळी ७ या वेळात अवजड वाहनांची एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. तर संध्याकाळी ७ नंतर सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही पूरस्थिती नाही. सर्व नद्या इशारा पातळी खाली वाहत आहेत. जिल्ह्यातल्या ६ कुटुंबांमधल्या २६ जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या ११ धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु असून शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण ६३ टक्के , मुकणे धरण ७२ टक्के, वालदेवी  धरण ९४ टक्के, गौतमी गोदावरी ८२ टक्के तर कश्यपी धरण ६९ टक्के इतकं भरलं आहे. भावली, वाघाड, आळंदी, हरणबारी, ओझरखेड, तिसगाव, केळझर ही छोटी धरणं  १०० टक्के भरली आहेत. निफाड तालुक्यातल्या नांदूरमध्येश्वर बंधाऱ्यातून सध्या ३८ हजार, दारणा धरणातून ११हजार  तर गंगापूर धरणातून ७ हजार क्यूसेक पाण्याचा  विसर्ग सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या अतीदुर्गम  भागात नर्मदा नदी किनाऱ्याजवळच्या परिसरात गेले चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून रस्ते वाहून गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्हाधिकारी आणि सर्व खाते प्रमुखांनी आज या भागाची पाहणी केली.  चिमलखेडी आणि परिसरातल्या आदिवासी बांधवांशी संवाद साधत जिल्हाधिकाऱ्यांनी यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधीत यंत्रणांना दिल्या.नाशिक जिल्ह्यात पुढील ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. ७० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यातली परिस्थिती सामान्य असून जिल्ह्यात कुठेही पूरस्थिती नाही. कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती नाही.