नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडोत्तर काळामधे भारताला कारखानदारीचं महत्त्वाचं केंद्र बनवण्यासाठी प्रशासकीय आणि तंत्रज्ञानाच्या पातळीवर कसोशीनं प्रयत्न चालू असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. उज्बेकिस्तानमधे समरकंद इथं शांघाय सहकार्य संघटनेच्या २२ व्या शिखर संमेलनात ते आज बोलत होते. जगात सर्वांसाठी अन्नसुरक्षा सुनिश्चित करणं महत्वाचं असून त्यादृष्टीनं शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांनी पुढाकार घ्यावा, भरड धान्याच्या उत्पादनावर भर द्यावा असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं.

सदस्य देशांमध्ये परस्पर विश्वास आणि सहकार्य वाढीस लागावं असा भारताचा दृष्टिकोन असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी या संमेलनानिमित्त समरकंदमधे आलेल्या इतर देशांच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली असून, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनाही ते भेटणार आहेत. यावेळी संरक्षण, सहकार्य आणि लष्करी सामुग्रीचा पुरवठा याविषयी उभय नेत्यांमधे चर्चा होईल, अशी माहिती रशियाचे भारतातले राजदूत डेनिस आलिपोव्ह यांनी दिली. उज्बेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्जियोयेव यांच्या आमंत्रणावरुन मोदी या संमेलनाला गेले असून, क्षेत्रीय आणि जागतिक संबंधात विविध व्यापारी, राजकीय आणि सांस्कृतिक मुद्यांवर चर्चेत भाग घेत आहेत.