मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी उद्या महाराष्ट्र विधानसभेत ठराव मांडण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. या संदर्भात राज्यसरकार इंचभरही माघार घेणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.आज सकाळी सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यावर विरोधी पक्षनेता अजित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हेतुल या प्रश्नाबाबत विधानं करत असल्याचा, आरोप पवार यांनी केला.कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत विधीमंडळात ठराव मांडायचा असं सर्वानुमते ठरलं होतं. मात्र अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु झाला, तरी हा ठऱाव मांडलेला नाही, याकडे पवार यांनी लक्ष वेधलं. राज्यसरकारने कर्नाटक मुख्यमंत्र्यांना सडेतोड उत्तर दिलं पाहिजे, असं ते म्हणाले.
सीमाप्रश्नावर प्रक्षोभक वक्तव्य करून कर्नाटकचे मुख्यमंत्री मुद्दा विनाकारण तापवत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. हा प्रश्न तातडीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे नेला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. सीमाभागातले मराठी भाषक महाराष्ट्र राज्यसरकारकडे आशेने पहात आहेत, असं ते म्हणाले. सीमा प्रश्नाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहिर करावा, अशी मागणी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषदेत केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी चारच्या सुमाराला ठरावाविषयी सभागृहात निवेदन करतील, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांचं निलंबन मागे घ्यावं, अशी विनंती विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना केली. जयंत पाटील ज्येष्ठ आमदार आहेत, आणि त्यांच्याकडून अनवधानाने काही बोललं गेलं असेल, असं ते म्हणाले. गेल्या आठवड्यात जयंत पाटील यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केल्याचा आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिला होता.