नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मतदान प्रक्रियेत मोठे बदल करण्याची निवडणूक आयोगाची योजना आहे. यानुसार आता देशात कुठूनही दूरस्थ पद्धतीनं आपल्या मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान करता येणार आहे. आयोगानं दूरस्थ मतदानासाठी बहु मतदारसंघ रिमोट इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे विकसित केली आहेत.
या यंत्राद्वारे एका मतदान केंद्रावरून ७२ वेगवेगळ्या मतदारसंघांसाठी मतदान करता येणार आहे. या संदर्भात आयोगानं पुढच्या महिन्याच्या १६ तारखेला सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे. बैठकीत, तांत्रिक टीम आणि तज्ञ या मतदान यंत्राच्या वापराबद्दल माहिती देणार आहेत. निवडणूक आयोगानं सर्व राजकीय पक्षांना ३१ जानेवारीपर्यंत या मतदान प्रणालीबाबत त्यांच्या सूचना सादर करायला सांगितलं आहे.