नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर रवाना झालेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राजधानी रियाध इथं पोहोचले आहेत. रियाधचे गव्हर्नर फैसल बिन बांद्र अल् सौद यांनी त्यांचं राजे खलिद आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शाही टर्मिनलवर स्वागत केलं.

प्रधानमंत्री आज तिसऱ्या भावी गुंतवणूक उपक्रम मंचाच्या कार्यक्रमात आपले विचार व्यक्त करणार आहेत. संरक्षण, सुरक्षितता, व्यापार, संस्कृती, शिक्षण आणि दोन्ही देशातल्या जनतेमध्ये परस्परसंवाद ही सौदी अरेबियासोबत द्विपक्षीय सहकार्याची महत्त्वाची क्षेत्र आहेत, असं प्रधानमंत्र्यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात सांगितलं.

दोन्ही देशांदरम्यान धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी प्रधानमंत्र्यांचा हा दौरा उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा सौदी अरेबियातले भारतीय राजदूत औसाफ सईद यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली. राजे सलमान बीन अब्दुल अजीज अल सौद यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं आहे.

सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांची देखील ते भेट घेणार असून परस्पर हितांच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर आणि द्विपक्षीय सहकार्याच्या अनेक विषयांवर चर्चा करणार आहेत. नागरी हवाई वाहतूक, सुरक्षा, संरक्षण, पायाभूत सुविधा आणि अपारंपरिक उर्जा क्षेत्रासह विविध क्षेत्रांशी संबंधित किमान १२ करार या दौऱ्यादरम्यान होण्याची अपेक्षा आहे.