मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत शिवसेनेशी औपचारिक आणि अनौपाचारिक अशा दोन्ही चर्चा सुरु असून, आमच्यात संवाद सुरु आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत वर्षा या निवासस्थानी दिवाळीमिलन या कार्यक्रमात सांगितलं.
बाहेरुन येणा-या बातम्यांना फार महत्व देऊ नका, असं ते म्हणाले. राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल आणि शिवसेनेसोबत अद्याप कोणत्याही खात्यांची चर्चा झालेली नाही किंवा त्यांनी तशी मागणी केलेली नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मात्र खात्यांबाबत आम्ही गुणवत्ता हा निकष ठेवून निर्णय घेऊ, असं सांगितलं.
शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिलेला नाही असं ते म्हणाले. शिवसेनेशी चर्चा करण्यासाठी अमित शहा मुंबईत येणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून होणा-या टीकेबाबत नाराजी व्यक्त केली. भाजपाचे १०५ आमदार सोडून आणखी १० आमदारांचं समर्थन मिळाल्याचं सांगत आणखी पाच आमदार आपल्या पाठीशी येतील, अशी अपेक्षा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.