मुंबई (वृत्तसंस्था) : देशाच्या इतिहासात क्रांतिकारकांना देण्यात येणारी हीन वागणूक लक्षात घेऊन वर्तमानात या अन्यायाला सुधारून सर्व क्रांतिकारकांना योग्य गौरवित करण्याची आवश्यकता असल्याचं महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी प्रतिपादन केलं. स्वातंत्र्यवीर सावरकर हे समाजाचे शिल्पकार होते, समाजातील दोष दूर करणारे सुधारक होते, जातिभेदाविरोधात लढणारे योद्धे होते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात येणं हे तीर्थयात्रेसारखं असल्याचं राज्यपालांनी यावेळी बोलतांना सांगितलं ते म्हणाले २८ मे हा दिवस महाराष्ट्र शासनानं स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवदिन म्हणून घोषित केला आहे तर त्याच दिवशी दिल्लीत नव्या संसद भवनाच्या वास्तुचे उद्घघाटन होणार आहे,’असंही राज्यपालांनी  सांगितलं.

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त वीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं मेजर कौस्तुभ प्रकाश राणे मरणोत्तर यांना सावरकर शौर्य पुरस्कार २०२३ देण्यात आला. त्यांच्या मातोश्री ज्योति प्रकाशकुमार राणे यांनी त्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. आय. आय. टी. कानपूरचे संचालक प्रा. अभय करंदीकर हे विज्ञान पुरस्काराचे मानकरी ठरलेत.नागपूरच्या मैत्री परिवार या संस्थेला सावरकर समाजसेवा पुरस्काराने गौरवण्यात आले हे सर्व सावरकर स्मृतीचिन्ह पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात प्रदान करण्यात आले. पुरस्कार वितरण समारंभाला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि सह कार्यवाह स्वप्निल सावरकर उपस्थित होते.