नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पोर्ट मोरेस्बी इथं पापुआ न्यू गिनीचे प्रधानमंत्री जेम्स मारापे यांच्यासोबत इंडो-पॅसिफिक बेटांच्या मंचाच्या – तिसऱ्या शिखर परिषदेच्या सह- अध्यक्ष स्थानी होते. संपूर्ण जग सध्या अन्न, इंधन, खते आणि औषधांच्या जागतिक पुरवठा साखळीत नवीन आव्हानांचा आणि अडथळ्यांचा सामना करत असल्याचं त्यांनी या परिषदेला संबोधित करताना म्हटलं. जी- २० च्या माध्यमातून ग्लोबल साऊथच्या चिंता, अपेक्षा आणि आकांक्षा जगापर्यंत पोहचवणं ही भारताची जबाबदारी असल्याचं ते म्हणाले. भारतीय संकल्पनेत संपूर्ण जगाकडे एक कुटुंब म्हणून पाहिले जाते आणि वसुधैव कुटुंबकम हि भारताची मूळ प्रेरणा असल्याचं त्यांनी सांगितलं. पॅसिफिक क्षेत्रातले देश हे जागतिक व्यासपीठावर भारताच्या पाठीशी उभे असल्याचं पापुआ न्यू गिनीचे प्रधानमंत्री जेम्स मारापे यांनी यावेळी म्हटलं. जी २० आणि जी ७ सारख्या जागतिक व्यासपीठावर छोट्या बेट राष्ट्रांचा आवाज मजबूत करण्याचं आवाहन मारापे यांनी प्रधानमंत्र्यांना केलं.
प्रधानमंत्री मोदी हे ग्लोबल साउथचे नेते आहेत असं वर्णन त्यांनी केलं. पोर्ट मोरेस्बी मध्ये इलाबीच इथं आयोजित शिखर परिषदेला सुमारे १४ देशांचे नेते उपस्थित होते. पापुआ न्यू गिनीचे गव्हर्नर जनरल, बॉब डेड यांनी मोदी यांना ‘ग्रँड कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केलं. पॅसिफिक क्षेत्रातल्या बेट देशांची एकता वाढवण्यात आणि ग्लोबल साउथच्या समस्या मांडण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रधानमंत्री मोदींनी मारापे यांच्याशी द्विपक्षीय संबंधांवर व्यापक चर्चा केली. वाणिज्य, तंत्रज्ञान, आरोग्य आणि हवामान बदलाबाबत सहकार्य वाढविण्याच्या मार्गांविषयी मरापे यांच्याशी चर्चा झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे. प्रधानमंत्री पहिल्यांदाच पापुआ न्यू गिनीला भेट देत आहेत. प्रधानमंत्री दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात आज ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासोबत ते द्विपक्षीय बैठक घेणार आहेत.