नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करण्याच्या इशाऱ्यांसंदर्भात केंद्र सरकारनं नवीन नियमावलीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार आता ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित होणाऱ्या कार्यक्रमात तंबाखू उत्पादनांचा वापर दाखवला असला तर तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांचा इशारा कार्यक्रमाच्या सुरुवातीला, शेवटी आणि मध्यंतरात किमान ३० सेंकद द्यावा लागेल, या नियमाचं उल्लंघन झाल्यास प्रकाशकावर कठोर कारवाई करण्यात येईल. आरोग्य मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या आंतर मंत्रालय समितीला तक्रारी आधारे किंवा स्वयंप्रेरणेनं अशी कारवाई करता येईल.
आज जागतिक तंबाखू विरोधी दिनाचं औचित्य साधून ही अधिसूचना जारी करण्यात आली. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम होत असून यंदाची संकल्पना अन्न हवे, तंबाखू नको अशी आहे. शेतकऱ्यांना तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी जागरूक करुन त्यांना इतर पौष्टिक आणि शाश्वत पिकाच्या लागवडीसाठी प्रोत्साहित करणं हा जागतिक आरोग्य संघटनेच्या तंबाखू विरोधी मोहिमाचा उद्देश आहे.