नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खासगीपणासह नागरिकांचे मूलभूत अधिकार जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. नागरिकांच्या खासगीपणाचा भंग करणार्‍या कोणत्याही मध्यस्थाविरोधात सरकार कठोर कारवाई करेल, असं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री रवी शंकर यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.

व्हाट्सअपवर खासगीपणाचा भंग होत असल्याच्या प्रकरणांवर सरकार फार चिंतीत असल्याचं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. हे रोखण्यासाठी काय उपाययोजना आखल्या आहेत, असं सरकारनं व्हाट्सअपला विचारलं आहे. या संदर्भात व्हाट्सअपला सोमवार पर्यंत उत्तर देण्यास सांगीतलं आहे.

इस्रायलच्या पेगाससच्या माध्यमातून भारतीय वार्ताहर आणि मानवी हक्क कार्यकर्ते यांच्यावर काही लोक व्हाट्सअपच्या माध्यमातून हेरगिरी करत असल्याचं म्हणणं आहे. त्यानंतर हे पाऊल  उचललं असल्याचं सांगितलं जातंय.

इस्रायलच्या पेगाससच्या माध्यमातून राजनेता, मुत्सद्दी, पत्रकार आणि सरकारी अधिकारी अशा जागतिक स्तरावर जवळपास १ हजार ४०० लोकांवर  पाळत ठेवली जात असल्याचं व्हाट्सअपनं म्हटलं आहे.