नवी दिल्ली : देशाला यश प्राप्त करुन देण्याची आणि देशाचं भविष्य घडवण्याची ताकद शिक्षणात असून २१ व्या शतकातला भारत घडवण्यात शिक्षणाची भूमिका महत्त्वाची राहिली असल्याचं प्रतिपादन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दिल्लीच्या प्रगती मैदानावर आयोजित अखिल भारतीय शिक्षण संगम या संमेलनाचं उद्घाटन केल्यावर ते बोलत होते. नवीन शिक्षण धोरणा अंतर्गत मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य देण्यात आलं असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञान आणि आकलनाचं मोजमाप केवळ भाषा ज्ञानाच्या आधारे लागणार नाही असं प्रधानमंत्री म्हणाले. नवीन शिक्षण धोरणामुळे देशभरात एकच अभ्यासक्रम विविध २२ प्रादेशिक भाषांमधे शिकवला जाईल असं मोदी यांनी सांगितलं. विविध भाषांमधल्या पाठ्यपुस्तकांचं प्रकाशनही यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया – प्रधानमंत्री श्री योजनेअंतर्गत देशभरातल्या ६ हजार ७०७ शाळांना मिळून ६३० कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्रधानमंत्री मोदी यांनी वितरित केला.
नवीन शिक्षण धोरणाच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त हे संमेलन आयोजित करण्यात आलं असून ते दोन दिवस चालेल. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचंही भाषण यावेळी झालं. नवीन शिक्षण धोरणाच्या रुपाने स्वातंत्र्यसैनिकांचं स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली साकार होत असल्याचं ते म्हणाले.
या परिषदेत सोळा सत्रं आयोजित करण्यात आली असून प्रत्येक सत्रात वेगळ्या संकल्पनेवर चर्चा होईल. यात गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि प्रशासन, समान आणि सर्वसमावेशक शिक्षण, सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागास समुहाचे प्रश्न, राष्ट्रीय संस्था मानांकन आराखडा तसंच शिक्षणाचं जागतिकीकरण अशा विषयांचा समावेश आहे. शिक्षणसंस्था, धोरणकर्ते, उद्योग विश्वातले प्रतिनिधी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना या धोरणाच्या अंमलबजावणीदरम्यान त्यांनी केलेले सर्वोत्तम उपाय आणि त्यांचा दृष्टीकोन मांडण्याची संधी मिळणार आहे.