नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची चांद्रमोहीम चांद्रयान-दोनला शेवटच्या टप्प्यात आलेलं अपयश हा मोहिमेचा शेवट नसून नजीकच्या भविष्यात इस्रो सॉफ्ट लँडिंगचे आणखी प्रयत्न करेल, असं इस्रो अर्थात, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष के सिवन यांनी सांगितलं.

ते आयआयटी दिल्ली इथं सुवर्णमहोत्सवी पदवीदान समारंभात बोलत होते. चांद्रयान-दोनच्या सॉफ्ट लँडिंगमधे तांत्रिक अडचणी आल्या असल्या तरी चंद्राच्या पृष्ठभागापासून ३०० मीटर अंतरापर्यंत सर्व यंत्रणा सुरळीत कार्यरत होती याकडे त्यांनी लक्ष वेधलं. येत्या काही महिन्यात आणखी प्रगत अंतराळ मोहिमा राबवण्यात येणार असल्याचं सिवन यांनी यावेळी सांगितलं.