पुणे : देशातील पाण्याच्या स्त्रोतांचे मोजमाप करण्याचे काम सुरू केले आहे. लवकरच जलस्त्रोतांच्या मोजमापाचे हे काम पुर्ण होणार असून जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून देशाला जलस्वंयपूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री गजेंन्द्रसिंग शेखावत यांनी येथे केले.
जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल विज्ञान प्रकल्पाअंतर्गत पुण्यात शाश्वत पाणी व्यवस्थापन या विषयावर दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद पुण्यातील नगर रोडवरील हॉटेल हयात रीजेंसी येथे सुरू झाली. या परिषदेच्या उद्धाटनप्रसंगी शेखावत बोलत होते. यावेळी खासदार वंदना चव्हाण, जलशक्तीचे सचिव यु.पी. सिंग, जलसंसाधन विकासचे प्रधान सचिव आय. एस. चहाल, राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाचे वरिष्ठ सहआयुक्त राकेश कश्यप, जलशक्ती मंत्रालयाचे प्रकल्प समन्वयक अखील कुमार, आँस्ट्रेलियन दूतावास टोनी हुबेर, दिपक कुमार, जलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र पवार, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे महासंचालक एन. व्ही. शिंदे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता वी.जी. रजपूत, राजेंद्र मोहिते, जल विज्ञान प्रकल्पाचे मुख्य अभियंता श. द भगत आदी उपस्थित होते. इंडिया डब्लु डब्लु आर एस डाटा एन्ट्री या मोबाईल, कुकडी इरिगेशन रोटेशन अँपचे उद्घाटन आणि जलदूत या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
जलशक्ती मंत्री शेखावत म्हणाले, शाश्वत पाणी व्यवस्थापन ही अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यशाळा आयोजित केली, ही चांगली बाब आहे. पाणी बचतीसोबतच पाणी व्यवस्थापनावर चर्चा होत आहे. देशात विविध बदलते भाग आहेत. पाण्याचे महत्व हे पूर्वीपासून सांगितले जाते. आताही ते सांगितले जात आहे. बदलत्या हवामानाच्या काळात पाण्याचे महत्व आणखी वाढले आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचे महत्व आणखी वाढत आहे. देशात प्रदेशनिहाय पाण्याची स्थिती बदलते आहे. महाराष्ट्रात दिवाळीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. हा बदलत्या हवामानाचा परिणाम आहे. पाण्याचा विषय लक्षात घेऊन जलशक्ती मंत्रालय स्थापन करण्यात आले. त्यामुळे पाण्याचे महत्व आणखी वाढले आहे. पाण्याशिवाय जीवन हे अशक्य आहे.
देशातील पाण्याच्या स्त्रोतांचे मोजमाप करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मार्च 2020 पर्यंत मोजमाप करण्याचे पहिल्या टप्प्यातील काम पुर्ण होणार असून उर्वरित काम दोन वर्षात पुर्ण होईल असे सांगून शेखावत म्हणाले, 2024 पर्यंत घराघरांत पिण्याचे पाणी देण्याचे उद्दीष्ठ ठेवले आहे. पंतप्रधानानी जे उद्दीष्ठ ठेवले आहे. त्याची चर्चा जगभर होत आहे. शेतीखालील पाण्याची बचत करण्यासाठी ठिंबक सिंचनाला महत्व दिले आहे. त्यावर शासन काम करत आहे. त्यामुळे पाण्याची मोठी बचत होत होऊन उत्पादन घेण्याचे आवाहन केले जात आहे. नदीमध्ये स्वच्छ पाणी वाहिले पाहिजे. शासन नदी स्वच्छतेचे काम हाती घेणार असून पाणी हा विषय फक्त राज्याचा विषय राहिला नाही. तर ते देशाचे मिशन झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
टोनी हुबेर म्हणाले की, “हवामान बदलामुळे पावसावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. जलशक्ती अभियानाच्या माध्यमातून हे काम होत आहे. भारतातील पाणी व्यवस्थापन चांगले असल्याचे त्यांनी सांगितले.
जलशक्तीचे सचिव यु. पी सिंग म्हणाले, शाश्वत पाण्याचे व्यवस्थापन करावे लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून पाण्याचे महत्व सांगितले आहे. स्वच्छ भारत अभियान, जलशक्ती अभियान राबविण्याचा केंद्राने निर्णय घेतला आहे. भारतात पाण्याचे चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन होऊ शकते. यामध्ये हिवरेबाजार हे मुख्य उदाहरण आहे. प्रधान सचिव आय. एस. चहाल यांनी प्रास्तविक केले. चेअरमन खलील अन्सारी यांनी आभार मानले.
या परिषदेसाठी जागतिक बँक तसेच सिंचन व निचरा विषयक कमिशन कमिशनचे तज्ज्ञ तसेच ऑस्ट्रेलिया, यु.एस. यु.के.नेदरलँड, कॅनडा, दक्षिण कोरीया, युरोपियन युनियन, जर्मनी, थायलंड, श्रीलंका आणि नेपाळ, या देशांमधील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ सहभागी झाले आहेत.