नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणारी बारावीची परीक्षा उद्यापासून सुरू होणार आहे. या परीक्षेसाठी एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये ८ लाख २१ हजार ४५० विद्यार्थी आणि ६ लाख ९२ हजार ४२४ विद्यार्थीनी आहेत. संपूर्ण राज्यात ३ हजार ३२० मुख्य केंद्रांवर परीक्षा होणार आहे. यावर्षीही परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आलेली आहे. परीक्षा काळातल्या संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा यादृष्टीने संपूर्ण राज्यात २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहेत.

परीक्षांच्या कालावधीत नकारात्मक विचार आणि मानसिक दडपणाखाली असलेल्या विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी १० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच राज्य मंडळ आणि ९ विभागीय मंडळात हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.