नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि तसंच जगभरातल्या लोकांनी स्वागत केलं आहे. ज्याप्रमाणे सर्व भारतीयांनी या निर्णयाचं स्वागत केला आहे, त्यावरून भारतीय सलोख्याची प्राचीन संस्कृती किती मजबूत आहे, हे प्रतिबिंबित होतं, अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

सर्व जाती धर्मांच्या लोकांनी हा निर्णय स्वीकारून समानतेचा अमूल्य असा ठेवा कायम ठेवावा आणि  शांतता आणि ऐक्य कायम राखण्याबाबत कटीबद्ध रहावं, कोणत्याच अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन  केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी केलं आहे. या निर्णयामुळे भारतीयांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास आणखी दृढ होईल, असा विश्वास लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केला.

भारतीय संविधानानं आखून दिलेल्या निधर्मी मूल्यांचं सर्वानी जतन करत न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करावं, असं काँग्रेस पक्षानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. न्यायालयाच्या निकालामुळे देशाची धर्मनिरपेक्षी प्रतिमा आणखी मजबूत होण्यास मदत होईल, असं समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले.

बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे भारतीय संविधान आणि लोकशाही मजबूत असल्याचं स्पष्ट होतं, असं मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मांडलं. उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डानं यानिर्णयाचा स्वागत करतानाच या निर्णयाला आव्हान ना देण्याचं ठरवलं आहे. राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष घयोरूल हसन रिझवी यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते लाल कृष्ण अडवाणी यांनी या निर्णयामुळे अत्यानंद झाल्याचं म्हटलं आहे. दशकांपासून सुरु असलेला वाद शेवटी संपुष्टात आला आहे, या निर्णयामुळे हिंदू आणि मुसलमान दोघेही आनंदित झाले असतील अशी प्रतिक्रिया भारतीय-अमेरिकी समुदायानं दिली आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शांती राखण्यासाठी केलेल्या आवाहनाचं अमेरिकी प्रवक्ते मॉर्गन ओर्टागस यांनी स्वागत केलं आहे.