नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेचे माजी संरक्षण सचिव आणि अध्यक्षपदाचे उमेदवार गोताबाया राजपक्षे यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. गोताबाया यांना एकूण वैध मतांच्या 52 पूर्णांक 25 शतांश टक्के इतकी मतं त्यांना मिळाली.

श्रीलंकेच्या निवडणूक आयोगानं जारी केलेल्या मतमोजणीच्या अंतिम आकड्यानुसार राजपक्षे यांना 69 लाख, तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या साजीत प्रेमदासा यांना 55 लाख 60 हजार मतं मिळाली. प्रेमदासा यांनी पराभव स्वीकारला असून राजपक्षे यांचं अभिनंदन केलं आहे. राजपक्षे अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.

एलटीटीई अर्थात लिबरेशन ऑफ तामिळ टायगर इलम या संघटनेच्या विरोधात झालेल्या युद्धाच्या वेळी राजपक्षे हे संरक्षण सचिव होते. पराभवानंतर प्रेमदासा यांनी युनायटेड नॅशनल पार्टीच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याबरोबरच त्यांचे निकटवर्तीय असलेल्या सध्याच्या सरकारमधल्या क्रीडामंत्री हरीन फर्नांडो आणि अन्य काही मंत्र्यांनीही राजीनामा दिले आहेत. दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गोताबाया यांचं अभिनंदन केलं आहे.