नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यू डेव्हलपमेंट बँकेचं विभागीय कार्यालय भारतात लवकर सुरु करावं, असं आव्हान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ब्रासिलिया इथं ब्रिक्स व्यापार परिषद आणि न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याशी संवाद साधताना प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की, विभागीय कार्यालय लवकर सुरु झालं तर, आपल्या प्राधान्य क्षेत्रातल्या प्रकल्पांना चालना मिळेल.
जागतिक वाढीला चालना देण्यासाठी या बहुपक्षीय वित्त संस्थेला संपूर्ण पाठिंबा देण्याची भारताची तयारी आहे, असं ते म्हणाले. पुढच्या शिखर परिषदेपर्यंत ब्रिक्स देशांमधला व्यापार ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी योजना तयार करावी, असं आवाहन मोदी यांनी ब्रिक्स व्यापार परिषदेला केलं. सदस्य देशांमधला आर्थिक सद्भाव महत्त्वाचा आहे, असं ते म्हणाले. न्यू डेव्हलपमेंट बँकेची उर्वरित दोन विभागीय कार्यालयं पुढच्या वर्षी रशिया आणि भारतात सुरु करण्याचा प्रयत्न राहील, असं ब्रिक्सच्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे.
आपत्ती प्रतिकारक पायाभूत सुविधांसाठीच्या जागतिक आघाडीत ब्रिक्स देशांनी तसंच न्यू डेव्हलपमेंट बँकेनं सहभागी व्हावं, अशी विनंती मोदी यांनी केली. ब्रिक्स व्यापार परिषद आणि न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्यातला भागीदारी करार दोघांसाठीही उपयुक्त ठरेल, असं ते म्हणाले. ब्रिक्समधल्या पाच देशांमधे उदयाला आलेल्या अनेक अँँयग्रोटेक उदयोगांचं जाळं या देशांमधल्या मोठ्या बाजारपेठांचा लाभ घेण्यासाठी तसंच अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ब्रिक्स परिषदेला हजेरी लावून मायदेशी परत निघाल्यानंतर प्रधानमंत्र्यांनी ट्विट करुन या परिषदेबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. व्यापार, नवोन्मेश, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक संबंध घट्ट करण्यासाठी या परिषदेत सहभागी नेत्यांनी केलेली चर्चा फलदायी असून, भाविष्यवेधी-अपारंपरिक विषयांवर दिलेला भर सहकार्य दृढ करण्यासाठी उपयुक्त ठरेल, त्याचा लाभ संबंधित देशांमधल्या नागरिकांना मिळेल, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.