नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या संरक्षण उद्योगाची उलाढाल २६ अब्ज डॉलर करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पुनरुच्चार केला आहे. ते बँकॉक मध्ये इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सनं आयोजित केलेल्या इंडिया रायझिंग या व्यावसायिकांच्या परिषदेत बोलत होते.
आयातीवर भार कमी करून मेक इन इंडियाअंतर्गत संरक्षण उद्योगांना प्राधान्य देण्याचं सरकारचं धोरण असल्याचंही ते म्हणाले. गेल्या दोन वर्षात संरक्षण साहित्याच्या निर्यातीत सहापट वाढ झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं. २०२५ पर्यंत संरक्षण साहित्य आणि हवाई क्षेत्रात १० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक अपेक्षित असल्यानं या क्षेत्रात २० ते ३० लाख लोकांना रोजगार मिळू शकेल,असंही ते म्हणाले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे अशियाई देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेलाही उपस्थित राहिले. यावेळी बोलतांना त्यांनी शाश्वत प्रादेशिक सुरक्षिततेसाठी जागतिक समुदायानं दहशतवाद्यांच्या संपर्क यंत्रणेला नेस्तनाबूत करून त्यांचा वित्तपुरवठा रोखण्यासाठी आणि त्यांचा सीमापार वावर थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं.