पुणे : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुणे महापालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पदभार स्वीकारला. आयडीईएस डॉ. राजेंद्र जगताप यांच्याकडे जून 2017 पासून 14 नोव्हेंबर 2019 पर्यंत प्रतिनियुक्तीवर सीईओचा कार्यभार होता.

भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) अधिकारी रुबल अग्रवाल या सध्या पुणे महानगरपालिका येथे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आहेत आणि पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. अगरवाल या 2008 पासून महाराष्ट्र राज्यात कार्यरत आहेत आणि त्यांनी महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये सेवा बजावली आहे.

रुबल अग्रवाल म्हणाल्या, “पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पांना औंध-बाणेर-बालेवाडी भागातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यापुढेही नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांना पाठिंबा मिळेल अशी आशा आहे.”

पुणे स्मार्ट सिटीबद्दल…

अलीकडच्या काळात पुणे स्मार्ट सिटीने रस्ते पुनर्रचना, मोफत पुणे वाय-फाय सेवा, स्मार्ट प्लेसमेकिंग- थीम पार्क्स, लाईटहाऊस आणि नागरिक सहभाग संवाद बैठका अशा प्रकल्पांची यशस्वीपणे अंमलबजावणी केली आहे. त्याचप्रमाणे पुणे स्मार्ट सिटी देशातील इतर स्मार्ट सिटींना मार्गदर्शन करण्याचे कामसुद्धा करत आहे. पंतप्रधानांच्या मतदारसंघातील वाराणसीसह धरमशाला (हिमाचल प्रदेश), फरिदाबाद (हरियाणा), मदुराई, सालेम, तिरुचिरापल्ली, तिरुप्पूर, वेल्लोर, इरोड (तामिळनाडू) आणि वाराणसी येथील अधिकाऱ्यांनी पुणे स्मार्ट सिटीला भेटी देऊन महत्त्वाच्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी पुणे स्मार्ट सिटीकडून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन घेतले आहे.

सातत्यपूर्ण कामगिरी…

अलीकडच्या काही महिन्यांत पुणे स्मार्ट सिटीला राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. स्कॉच अवॉर्ड, स्मार्ट सिटीज इंडिया अवॉर्ड्स २०१८ मध्ये चार राष्ट्रीय पुरस्कार आणि बिझनेस वर्ल्ड् डिजिटल इंडिया समिट अँड ऍवॉर्ड्स २०१८ मध्ये सर्वोत्कृष्ट आयसीटी हे पुरस्कार पुणे स्मार्ट सिटीने पटकावले आहेत.