जुन्नर तालुक्यातील घटना; महिला पोलीस उप अधिक्षकेचा तीन आठवडे कानाडोळा
पुणे : तुम्ही पोलीस अधीक्षकांना जाऊन भेटलात ना?, त्यांनी दिले का तुम्हाला पोलीस संरक्षण? तुमच्या पीडित मुलीला यापुढे खासगी गाडीतून शाळेत नेऊन सोडा किंवा शाळेजवळ घर विकत घेऊन तिकडे राहायला जा, आरोपीच्या मित्रांची नावे आम्हाला सांगत बसू नका, त्यांना आम्ही गावात बंदी घालायची काय? हे सवाल आहेत पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील पोलीस उपअधीक्षक असलेल्या एका महिलेनेच बलात्काराची शिकार झालेल्या बौद्ध समाजातील अल्पवयीन मुलीच्या पालकांना केलेले.
जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल रोजी साजऱ्या झालेल्या जयंतीची धामधूम असतानाच मध्यरात्री अल्पवयीन बौद्ध बालिकेवर बलात्काराची घटना घडली आहे. बलात्कारी नराधम देविदास दिनकर घाडगे (२९) हा पीडित बालिका नववीत शिकत असलेल्या शाळेत विद्यार्थ्यांच्या बसचा चालक आहे. ती मुलगी जयंतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमातुन अर्ध्यावर घरी परतली होती. ती घरानजीकच शौचास गेली असता तिचा पाठलाग करून दबा धरून बसलेल्या आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.
पोलीस उप अधीक्षक दीपाली खन्ना आणि स्थानिक ओतूर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांनी बलात्काराची घटना घडून गेल्यानंतर तब्बल 18 दिवसांनी घटनास्थळी भेट दिली, पण तीही पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आदेश दिल्यानंतर, आठवडाभराने म्हणजे 2 मे रोजी.
त्याआधी पीडित मुलीच्या पालकांनी 25 एप्रिल रोजी पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन पोलिसांच्या उदासीनतेची तक्रार केली होती.
पोलीस उपअधीक्षक दीपाली खन्ना आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांनी गुन्हा घडल्यानंतर 18 दिवसांनी घटनास्थळी भेट दिली खरी, पण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे धाव घेतल्याबद्दल उप पोलीस अधीक्षकांनी आम्हालाच फैलावर घेतले, असे पीडित मुलीचे वडील अरुण धोत्रे यांनी सांगितले. ते तलाठी कार्यालयात कर्मचारी आहेत.
धोत्रे हे आपल्या मुलीवरील अत्त्याचाराची दाद मागण्यांसाठी मुखमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे पत्नीसहीत मंगळवारी मुंबईत आले आहेत.
आपल्या अल्पवयीन कन्येवरील बलात्काराच्या प्रकरणांच्या तपासाचा एक महिला पोलीस उप अधिक्षकच विचका करत आहे, असा आरोप धोत्रे यांनी केला.
आरोपी देविदास घाडगे याला अटक होऊन तो गजाआड जाताच ओतूर येथील श्री गाडगे महाराज विद्यालयाच्या संचालकांनी लगेचच त्याचा भाऊ गोरक्ष किसन घाडगे याला नोकरी देण्याचे औदार्य दाखवले आहे, अशी धक्कादायक माहिती त्यांनी दिली.
या प्रकरणात पीडित कन्येची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेल्या नारायणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. डी. सुरवसे हे ‘प्रकरण मिटवून टाका’ असे निरोप कर्मचाऱ्यांमार्फत पाठवत आहेत, असेही अरुण धोत्रे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.