नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेला आपल्या विकासागाथेत सहभागी करण्यासाठी भारत इच्छुक आहे, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती भवनात श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे आणि राष्ट्रपतीं कोविंद यांची बैठक झाली.
या बैठकीत राष्ट्रपती कोविंद यांनी सांगितलं की, उभय देशांमधले आर्थिक संबंध अधिक वृद्धिंगत करून भारताला दोन्ही देशांमधली परस्पर गुंतवणूक वाढवायची आहे. विकास सहकार्य हा भारत आणि श्रीलंके दरम्यान असणाऱ्या संबंधांचा सक्षम आधार आहे, असं ते म्हणाले. शेजारी देश असल्यामुळे दोन्ही देशांची प्रगती परस्परांशी जोडलेली आहे.
क्षेत्रीय शांतता आणि समृद्धीसाठी उभय देशांचं योगदान महत्वाचं आहे, असं रामनाथ कोविंद यांनी सांगितलं. सुरक्षा आणि विकासाला चालना देण्यासाठी दोन्ही देशांनी परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.