मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं नवं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं पहिलं अभिभाषण विधानसभेत झालं. राज्य सरकार समाजातल्या सर्व घटकांची सेवा करण्यासाठी वचनबद्ध असेल, तसंच हे सरकार जनतेला स्वच्छ, पारदर्शक, निर्णयाभिमुख शासन देईल अशी ग्वाही राज्यपालांनी आजच्या अभिभाषाणातून दिली.

हे सरकार महापूर आणि दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यासाठी, शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही राज्यपालांनी दिली, शेतमालाला योग्य भाव मिळवा यासाठीही उपाययोजना राबवल्या जातील असं त्यांनी सांगितलं.

भूमिपुत्रांना नोकरीत आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जातील, राज्यातल्या जनतेला १० रुपयांत जेवण देण्यासाठी योजना राबवली जाईल असं आश्वासन राज्यपालांनी दिलं. सीमाभागातल्या ८६५ गावांमधल्या सर्व मराठी भाषिकांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी हे सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाहीदेखील राज्यपालांनी आजच्या अभिभाषातून दिली.

आपत्ती व्यवस्थापन, किनारपट्टीचं संरक्षण, मराठवाड्यातली पाणीटंचाई दूर करण्यासाठीच्या उपाययोजना, महिला सुरक्षा, आर्थिक दुर्बल घटक तसंच मुलींच्या शिक्षणासाठी विशेष योजना, शिक्षणाच्या दर्जात सुधारणा, आरोग्यविषयक सोयीसुविधा, अंगणवाडी सेविकांना सहाय्य, बचतगटांचं सक्षमीकरण, झोपड्डपट्टी पुनर्वसन, रस्ते आणि इतर पायाभूत सोयी सुविधांचा विकास, मराठी भाषेचा प्रचार प्रसार आणि जतन संवर्धनासाठीचे प्रयत्न अशा अनेक मुद्यांवर सरकार काम करेल अशी ग्वाही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या अभिभाषणातून दिली.