नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं आपल्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत उत्सर्जनाचं प्रमाण २१ टक्क्यांनी कमी केलं असून पॅरिसमध्ये मान्य केल्यानुसार उत्सर्जनात ३५ टक्के घट करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर वाटचाल करत असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

ते स्पेनमध्ये माद्रिद इथं सुरू असलेल्या कॉप-२५ या परिषदेत बोलत होते. या परिषदेत त्यांनी भारताची भूमिका मांडली. उत्सर्जनाचं प्रमाण कमी करण्याच्या आश्वासनांची पूर्तता भारत करत आहे, असं त्यांनी सांगितलं. दोन डिसेंबरपासून ही परिषद सुरू झाली असून ती १३ डिसेंबरपर्यंत चालण्याची शक्यता आहे. यामध्ये १९० देश सहभागी झाले आहेत.