नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ६६ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभ येत्या सोमवारी नवी दिल्ली इथं होणार आहे. उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जातील. हेलारो या गुजराती चित्रपटाला यंदाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे.
हिंदी चित्रपट क्षेत्रातले अभिनेते आयुषमान खुराना आणि विकी कौशल यांना सर्वोत्कृष्ट अभिनेते म्हणून, तर किर्थी सुरेश या तेलुगु अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रिच्या पुरस्कारानं गौरवलं जाईल. उरी चित्रपटासाठी आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार दिला जाईल.
अनेक मराठी चित्रपट आणि कलाकारांनाही राष्ट्रीय पुरस्कारनं गौरवलं जाणार आहे. भोंगा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाच्या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. नाळ या चित्रपटातला बालकलाकार श्रीनिवास पोफळे याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा, नाळ या चित्रपटासाठीच सुधाकर रेड्डी यांना सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा तर, चुंबक या चित्रपटातल्या भूमिकेसाठी गीतकार स्वानंद किरकिरे यांना सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार दिला जाईल.
पाणी या मराठी चित्रपटाला पर्यावरण संवर्धनविषयक सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्रदान केला जाईल. उत्तराखंड राज्याला चित्रपट स्नेही राज्याचा पुरस्कार दिला जाणार आहे.