पुणे : हवेली तालुक्यातील पेरणे फाटा (कोरेगाव भिमा) येथे १ जानेवारी रोजी होणारा जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी विविध पक्ष, संस्था व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व याठिकाणी भेट देणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मौजे पेरणे (कोरेगाव भिमा) येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाची पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. राम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख तसेच भिमा कोरेगाव, पेरणे, वढु बु. सह जिल्ह्यातील विविध पक्ष, संस्था-संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, गावकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमास मोठया प्रमाणात नागरिक उपस्थित राहतात. हा कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले असून त्यानुसार कामे केली जातील. याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी विविध विभाग कार्यरत आहेत. स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करुन हा कार्यक्रम अधिकाधिक चांगल्या प्रकारे पार पाडून जिल्हयाच्या लौकिकात भर घालुया, असे आवाहनही श्री. राम यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी तसेच जयस्तंभ येथे भेट देणाऱ्या नागरिकांची व गावकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागांनी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना संबंधित विभागाच्या वतीने आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरवण्यात येतील, असे सांगून जयस्तंभ परिसरात पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी चार हायमास्ट दिवे लावण्यात येणार आहेत. तसेच पेरणे फाटा ते पेरणे गाव या रस्त्यावर कायम स्वरुपी पथदिवे बसविण्याचे काम लवकरच पुर्ण होईल. याबरोबरच मुख्य रस्ता आणि वाहनतळ येथे तात्पुरत्या स्वरुपात प्रकाश व्यवस्था व ध्वनीक्षेपण व्यवस्था करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. राम यांनी सांगितले. टँकरव्दारे पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे, फिरते स्वच्छतागृह, ये-जा करण्याकरीता एस.टी. महामंडळ व पी.एम.पी.एम.एल च्या पुरेश्या बसेस ची सोय करण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या वतीने रुग्णवाहिका व पुरेसा औषधसाठा तयार ठेवण्यात येत आहे. बांधकाम विभागाच्या वतीने या ठिकाणचे सुशोभीकरण, रस्ते दुरुस्ती, बांधकाम दुरुस्ती, सी.सी.टी.व्ही कॅमेरे, प्रशस्त वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे. अग्नीशमनवाहिका तसेच आवश्यक त्या सुविधा वेळेत पुरवण्यासाठी सर्वांनी एकमेकांशी समन्वय ठेवून कार्यवाही करण्याच्या सुचना सर्व विभागांना देण्यात आलेल्या आहेत. याबरोबरच वाहतूक विभाग, महानगरपालिका, जिल्हा परिषद, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अन्न, औषध व प्रशासन विभागाबरोबरच संबंधित विभागांनी या ठिकाणी योग्य ती भूमिका बजावण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
पोलीस अधीक्षक संदिप पाटील म्हणाले, पेरणे जयस्तंभ अभिवादन दिन हा शौर्याचा अभिमान बाळगण्याचा दिवस असून या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने लोकभावनांचा आदर राखून प्रशासनास सहकार्य करावे. येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी प्रशस्त पार्किंगची सोय तसेच लहान बालकांच्या मातांसाठी हिरकणी कक्ष उभारण्यात येईल. लांबच्या अंतरावर असणाऱ्या नागरिकांना अभिवादन स्थळाची क्षणचित्रे दिसण्यासाठी एलईडी स्क्रीन लावण्याचे नियोजन करण्यात येत आहे. नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी पोलीस प्रशासन कटीबध्द आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी अतिरिक्त पोलीस यंत्रणा येथे कार्यरत राहिल. हा कार्यक्रम शांततेने पार पाडून पुणे जिल्हा हा सर्वांना सामावून घेणारा जिल्हा असल्याचे दाखवून देवूया, असे आवाहन श्री. पाटील यांनी यावेळी केले.
जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठया प्रमाणात नागरिक उपस्थित राहतात, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी या दिवशी कोणत्याही प्रकारची अफवा पसरु नये, यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले.
पोलीस उपायुक्त मितेश घट्टे म्हणाले, अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे. नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासनाने काही निर्बंध घातल्यास नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. नागरिकांनी प्रशासनासोबत राहून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याचे आवाहन यावेळी उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी केले. बैठकीत पेरणे, भिमा कोरेगाव, वढु व जिल्ह्यातील विविध पक्ष, संस्था, संघटनांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक यांनी अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध सूचना मांडल्या, तसेच सर्वांनी सहकार्य देण्यात येईल, असे सांगितले.