पुणे : युवा वर्गात उद्योजकतेची प्रेरणा निर्माण होण्यासाठी सहाय्यभूत ठरणारी सर्वसमावेशक स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणारी महत्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज केल्या.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त कार्यालय आणि महाराष्ट्र उद्योजकता केंद्र (एमसीइडी) शिवाजीनगर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत विभागीय कार्यशाळेचे उदघाटन विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे, उपायुक्त (महसूल) प्रताप जाधव, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट तज्ज्ञ विजय जाधव, उद्योग संचालनालयाचे अधीक्षकीय उद्योग अधिकारी सुरेश लोंढे, पी. डी. रेंदाळकर, बँक ऑफ महाराष्ट्रचे असिस्टंट जनरल मॅनेजर अभिनव काळे, एमसीइडीचे विभागीय अधिकारी मदनकुमार शेळके, यु. डी. क्षीरसागर, उपस्थित होते.
डॉ दीपक म्हैसेकर म्हणाले, मोठया प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्यासाठी, सुलभ वित्तपुरवठा उपलब्ध करुन स्थानिक तरुणांना स्वयं-रोजगाराकडे आकर्षित करुन सुक्ष्म व लघु उपक्रम स्थापित करणे हा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (सीएमईजीपी) योजनेचा उद्देश आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे.
प्रास्ताविकात सदाशिव सुरवसे म्हणाले, राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनविण्यासाठी, त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून सुलभतेने निर्माण होण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना राबविण्यात येत आहे. पुढील पाच वर्षात सुमारे 1 लाख सुक्ष्म व लघु उपक्रम स्थापित करून त्या माध्यमातून एकूण 10 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचे प्रमुख उद्दीष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अभिनव काळे, सुरेश लोंढे, पी.डी. रेंदाळकर यांनी सादरीकरण केले. या कार्यशाळेस अंमलबजावणी यंत्रणा, बँकेचे अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.