नवी दिल्ली : भारतातील इंटरनेट सेवा आता अधिकाधिक वेगवान आणि इंटरअँँक्टिव्ह होणार आहे. यासाठी 5G तंत्रज्ञान मोलाची भर टाकणार आहे. या नव्या तंत्रज्ञानासाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे देशातील सर्व मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आता 5G च्या चाचण्या घेणार आहेत. केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी याबाबत माहिती दिली आहे.

यापूर्वी 4G इंटरनेट सुविधेमुळे भारतातल्या इंटरनेट क्षेत्रात मोठी क्रांती घडून आली आहे. यामुळे लोकांच्या हातातील जुन्या आणि मर्यादित सुविधा उपलब्ध असणारे मोबाईल फोन जाऊन त्याची जागा स्मार्टफोन्सनी घेतली. यानंतर आता भारत इंटरनेटच्या दुनियेत आणखी मोठ्या बदलावर स्वार होण्यासाठी सज्ज झाला आहे.

सरकार टेलिकॉम क्षेत्रातील सर्व कंपन्यांना 5G स्पेक्ट्रम वाटणार आहे. त्यासाठी आम्ही 5G तंत्रज्ञानाची चाचणी घेण्याचे ठरवले आहे. यापुढे 5G चं आता भविष्य आहे. या तंत्रज्ञानाद्वारे आम्ही नव्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणार आहोत. सर्व टेलिकॉम कंपन्या या तंत्रज्ञानाच्या चाचणीमध्ये सहभागी होऊ शकतात, असे प्रसाद यांनी म्हटले आहे.