पुणे : ‘सारथी’ ची (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था) स्वायत्तता अबाधित ठेवावी या आणि इतर मागण्यांसाठी खा. छत्रपती संभाजीराजे आणि विद्यार्थ्यांचे उपोषण आज नगर विकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मागे घेण्यात आले.
मंत्री श्री. शिंदे म्हणाले, ‘सारथी’ची स्वायत्तता अबाधित राहील, यासाठी शासन कटिबद्ध आहे. आक्षेपांबाबतची चौकशी त्रयस्थ यंत्रणेमार्फत करण्यात येईल. तसेच मराठा मोर्चा आंदोलनातील गुन्हे मागे घेणे याबाबतही समिती नेमून निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले. ‘सारथी’चे महासंचालक डी.आर परिहार यांनी दिलेला राजीनामा स्वीकारण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘सारथी’ च्या सर्व योजना पुढे चालू राहतील, असे ते म्हणाले.
‘सारथी’ संदर्भात खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी सुरू केलेल्या एक दिवसीय उपोषणाच्या ठिकाणी मंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन छत्रपती संभाजी राजे यांच्याशी चर्चा करून सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. ‘सारथी’ची स्वायत्तता अबाधित राखली जाईल, हा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा शब्द 2. ओबीसी विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांना पदावरून हटवणार 3. गुप्ता यांनी जारी केलेले सर्व निर्णय रद्द 4. संस्थेचे महासंचालक श्री. परिहार यांचा राजीनामा स्वीकारण्यात येणार नाही 5. सर्व आक्षेपांविषयी त्रयस्थ यंत्रणेमार्फत उच्चस्तरीय चौकशी केली जाईल 6. मराठा आरक्षणासाठी संपूर्ण ताकदीने न्यायालयीन लढाई लढणार असल्याचेही मंत्री शिंदे यांनी सांगितले.
याप्रसंगी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण लढ्यात एकनाथ शिंदे यांनी बजावलेल्या भूमिकेबद्दल त्यांचे कौतुक केले.