नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि कश्मीर मधून कलम-३७० हटवल्यानंतर या संपूर्ण प्रदेशाचा नव्यानं उदय झाला आहे, असं प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. येत्या काळात या प्रदेशाचा जो कायापालट होईल, त्याचे दाखले अनेक वर्ष दिले जातील, असंही सिंह यांनी म्हटलं आहे.
जम्मू-काश्मीरच्या संपूर्ण क्षेत्राचा तसंच तिथल्या नागरिकांचा विकास व्हावा, यासाठी केंद्र सरकारनं सुरु केलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी एका विशेष मोहिमेअंतर्गत सिंग यांनी काल जम्मू-काश्मीरला भेट दिली. आपल्या या भेटीत सिंग यांनी अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटनही केलं. त्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमासाठी जमलेल्या नगरसेवक सरपंच आणि पंचांना त्यांनी संबोधित केलं.
जम्मू-काश्मीरमधल्या नागरिकांमधला आत्मविश्वास पुन्हा जागवणं आणि या संपूर्ण क्षेत्राचा आधुनिकतेनं विकास करणं हाच केंद्र सरकारच्या मोहिमेचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. इथल्या नागरिकांचं हित लक्षात घेऊन केंद्र सरकारनं गेले अनेक वर्ष रखडलेल्या प्रकल्पांसह अनेक नव्या विकास प्रकल्पांना मान्यता दिली आहे आणि महत्त्वाचे निर्णयही घेतले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. आपल्या भेटीत सिंह यांनी एका क्रीडा संकुलाची कोनशिला ठेवली तसंच जम्मू इथल्या गोल गुजराल इथं स्मार्ट क्लासरूम प्रकल्पाचं उद्घाटनही केलं.
नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय माध्यकम केंद्राच्या धर्तीवर जम्मू आणि काश्मिर तसंच लडाखमध्ये माध्यमांसाठी केंद्र सुरू केलं जाईल अशी घोषणाही सिंग यांनी या वेळी केली. केंद्रीय राज्यमंत्री अर्जून राम मेगवाल यांनीही सांबा जिल्ह्याला भेट दिली आणि आजवर रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेचं उद्घाटन केलं. यावेळी मेघवाल यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.
केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी देखील जम्मु प्रेस क्लब इथे जमलेल्या नागरिकांसोबत संवाद साधला. या क्षेत्रात आयुष्मान भारत योजनेची यशस्वी अंमलबजावणी करणाऱ्या अनेक भागधारकांचा सत्कारही त्यांच्या हस्ते करण्यात आला. जम्मू काश्मीरच्या सर्वसामान्य लोकपर्यंत पोचण्यासाठी केंद्रातील नऊ मंत्र्यांचे शिष्टमंडळ जम्मूमधील विविध ठिकाणी आज भेट देत आहेत.