बारामती : पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेंतर्गत 19 जानेवारी 2020 रोजी बारामती शहरामध्ये अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 0 ते 5 वर्षे वयोगटातील 10185 बालकांपैकी 9443 (920 %) मुलांना पोलिओ डोस पाजण्यात आला. या मोहिमेसाठी उपजिल्हा रूग्णालयामार्फत 79 बुथची व्यवस्था करण्यात आली होती.
या मोहिमेची सुरूवात नगराध्यक्षा सौ. पोर्णिमाताई तावरे यांचे हस्ते बालकाला पोलीओ डोस देऊन करण्यात आली. यावेळी सल्लागार समितीचे सदस्य श्री. तुकाराम मोरे, श्री. सुभाष (आप्पा) ढोले व बारामती रोटरी क्लबचे पदाधिकारी, उपजिल्हा रूग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
एनयुएचएम बारामती, शारदानगर नर्सिंग स्कूल व गिरीराज नर्सिंग स्कूल यांचे सहकार्याने तसेच एनयुएचएमचे प्रमुख डॉ. नाझीरकर यांच्या योग्य नियोजनामुळे पल्स पोलिओ मोहिम यशस्वीरीत्या पार पाडल्याचे अधिक्षक डॉ. सदानंद काळे यांनी सांगितले.
दिनांक 20 ते 24 जानेवारी 2020 या कालावधीमध्ये आयपीपीआय कार्यक्रमाव्दारे पोलिओ लसीकरणापासून राहिलेल्या मुलांना देखील पोलिओ डोस देण्यात येणार असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे यांनी यावेळी सांगितले.