मुंबई : मराठी भाषेचा विकास व संवर्धनासाठी मराठी साहित्यिकांनी केलेल्या सर्व सूचनांचा सन्मान केला जाईल, अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

‘मराठी भाषेच्या भल्यासाठी’ या संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक पद्‍मश्री मधु मंगेश कर्णिक, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, माजी संमेलनाध्यक्ष तथा कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, मराठवाडा साहित्य परिषदेचे सदस्य दादा गोरे, रमेश कीर आदींनी मंत्री श्री. देसाई यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे वर्मा उपस्थित होत्या.

श्री. देसाई म्हणाले, राज्य शासन इंग्रजी माध्यमांच्या शालेय अभ्यासक्रमात मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याबाबत येत्या अधिवेशनात कायदा करणार आहे. त्यासाठी विधी व न्याय विभाग, शालेय शिक्षण विभाग, भाषा विभागाची नुकतीच बैठक घेतली. त्यांच्या सर्व सूचनांचा विचार करून हा कायदा करण्यात येईल. कायदा करताना काही उपसूचना घेतल्या जातील. मराठी भाषा दिनी म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी हा कायदा संमत केला जाईल. कर्नाटक व इतर राज्यात असलेल्या कायद्याचा अभ्यास करून  मराठी भाषा अधिनियम तयार करण्यात येईल, अशी माहिती श्री. देसाई यांनी दिली.

महापालिका शाळांमधील मराठी शिक्षणाचा विकास व्हावा, यासाठी भाषा विभाग प्रयत्न करेल. मराठी वर्णमालेसंबंधातील शासन आदेशासाठी विशेष बैठक घेऊन संबंधितांना सूचना दिल्या जातील, असेही श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.

सांस्कृतिक कार्य मंत्री, शालेय शिक्षण मंत्री आणि मराठी भाषा या तिन्ही विभागाच्या समन्वयातून मराठी भाषेच्या विकासासाठी सातत्याने संवाद व्हावा, विभागाला आर्थिक तरतूद भरघोस असावी, वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत आणि मराठी शाळांच्या सक्षमीकरणासाठी समिती नेमावी  यासारख्या विविध मागण्यांवर यावेळी चर्चा  करण्यात आली.