नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथं पोर्तुगालचे अध्यक्ष मार्सेलो रिबेलो डी सुसा यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर दोन्ही देशांमधल्या विविध १४ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या अशी माहिती परराष्ट्र व्यवहारमंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी बातमीदारांना दिली आहे.
गुंतवणूक, दळणवळण, बंदरं, सांस्कृतिक तसंच औद्योगिक, बौद्धिक मालमत्ता आणि योग या क्षेत्रांत उभय देशांमधलं सहकार्य वृद्धींगत करण्याच्या हेतून हे करार करण्यात आले आहेत, असं कुमार यांनी सांगितलं.
मार्सेलो यांनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेतली. भारत आणि पोर्तुगालमधले आर्थिक संबंध वृद्धींगत होत असल्याचं कोविंद यांनी या भेटीनंतर सांगितलं. दोन्ही देशांमधल्या व्यापार एक अब्ज डॉलर्सहून अधिक वाढला असल्याचं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं यासाठी आपला पाठिंबा असल्याचं मार्सेलो यांनी यावेळी स्पष्ट केलं.






