नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताने कोरोनाविरुद्धच्या लढ्यात एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठला असून दररोज नव्याने आढळणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सलग १८व्या दिवशी ५० हजारांपेक्षा कमी राखण्यात देशाला यश आले आहे.
गेल्या २४ तासात सुमारे ४४ हजार नवे कोरोनाबाधित आढळले तर ३८ हजारांहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले. देशातील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९३ पूर्णांक ७२ शतांश टक्क्यांवर गेला असून नव्याने आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्यात्मक प्रमाणामध्ये तो २० टक्क्यांनी अधिक आहे.
सध्या देशात ४ लाख ४४ हजार ७४६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण रुग्णांपैकी ७७% रुग्ण महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल, हरियाणा, राजस्थान, दिल्लीसह १० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्येच आहेत.
मात्र, वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये केंद्र सरकारने केलेली वाढ आणि रुग्णांचा शोध, तपासणी, पाठपुरावा आणि उपचार या चतुःसूत्रीचा प्रभावी वापर यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने चढता राहिला असून मृत्युदर कमी होत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
गेल्या २४ तासात देशात ४८१ जणांचा कोविड-१९मुळे मृत्यू झाला. त्यामुळे आता देशातील कोविड रुग्णांचा मृत्यूदर १ पूर्णांक ४६ शतांश टक्के झाला आहे.
गेल्या २४ तासात देशात ११ लाख ६० हजारांहून अधिक कोविड-१९ प्रतिबंधक तपासणी चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे आत्तापर्यंत देशात करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या आता १३ कोटी ४९ लाखांवर गेली आहे.
केंद्र सरकार आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आय.सी.एम.आर. यांनी चाचण्यासाठीच्या पायाभूत सुविधा वाढविल्या असल्याने देशाची तपासणी चाचण्या करण्याची क्षमता दररोज १५ लाखांवर गेल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
सध्या देशात २ हजार १३४ प्रयोगशाळांच्या माध्यमातून या चाचण्या करण्यात येत आहेत.