सायबर सुरक्षेसंदर्भातील जनजागृतीसाठी महाराष्ट्र सायबर आणि इस्राईल दूतावासाचा उपक्रम

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता व इंटरनेट ऑफ थिंग्समुळे पुढील पंधरा वर्षांत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड बदल होणार आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात इंटरनेटचा शिरकाव होणार आहे. त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ होणार आहे. सायबर विश्वात स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने सजग रहावे. सायबर धोक्यापासून वाचण्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘सायबर सुरक्षादूत’ (अँम्बेसेडर) व्हावे, असे आवाहन सायबर सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञांनी सायबर सुरक्षा विषयावरील चर्चासत्रात केले.

सोशल मीडिया, इंटरनेट आणि नवे तंत्रज्ञान याचा विद्यार्थ्यांनी सुरक्षितरित्या वापर कसा करावा याची माहिती देण्यासाठी व सायबर गुन्ह्यांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी मुंबईतील इस्राईल दूतावास, नेहरू विज्ञान केंद्र आणि महाराष्ट्र सायबर यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. नेहरू विज्ञान केंद्रात झालेल्या या कार्यशाळेत मुंबईतील विविध शाळा व महाविद्यालयातील सुमारे अडीचशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.

इस्त्रायलचे मुंबईतील महावाणिज्यदूत याकोव फिन्कलस्टन, उपवाणिज्यदूत निमरोड कलमार आदी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, सायबर तज्ज्ञ रितेश भाटिया, ‘रिस्पॉन्सिबल नेटीझन’स्वयंसेवी संस्थेच्या सोनाली पाटणकर, आयआयटी मुंबईचे प्राध्यापक मनोज प्रभाकरन यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला.

या कार्यक्रमात इस्राईलमधील सायबर सुरक्षा तज्ज्ञ मेन्नी ब्राझिले यांनी स्काईपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दोन सत्रात झालेल्या या कार्यक्रमात पहिल्या सत्रात 14 ते 16 वयोगटातील शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते तर दुसऱ्या चर्चासत्रामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. श्री. ब्राझिले यांनी स्काईपच्या माध्यमातून सायबर विश्वातील घडामोडी व सायबर सुरक्षेसंदर्भात संवाद साधला. स्मार्ट फोन, इंटरनेट आणि इतर तांत्रिक उपकरणे वापरताना असलेल्या संभाव्य धोक्यांबद्दल माहिती देत त्यांनी ऑनलाईन जगात स्वतःचे संरक्षण कसे करावे हे विविध पद्धती सांगून स्पष्ट केले.

चर्चासत्रात महाराष्ट्र सायबरचे अधीक्षक सचिन पांडकर यांनी महाराष्ट्र सायबरच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध सायबर सुरक्षाविषयक उपाययोजनांची माहिती दिली. ते म्हणाले, सायबर गुन्ह्यांविरुद्ध महाराष्ट्र सायबर कडक पावले उचलत आहे. महिला व बालकांसंबंधीच्या सायबर गुन्ह्यांविरुद्ध आता थेट संकेतस्थळाच्या माध्यमातून तक्रार करता येणार आहे. तसेच फिशिंगच्या घटना टाळण्यासाठीही अँटिफिशिंग संकेतस्थळावर तक्रार केल्यास तातडीने दखल घेतली जाते. सायबर गुन्ह्यांविरुद्ध एकाच ठिकाणी सर्व सोयी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

सायबर सुरक्षा तज्ञ आणि अन्वेषक रितेश भाटिया आणि सायबर सुरक्षा आणि जनजागृतीसाठी सुरु केलेल्या ‘रिस्पॉन्सिबल नेटीझन’ या उपक्रमाच्या संस्थापिका सोनाली पाटणकर यांनीही विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा वापर करताना काय काळजी घ्यावी, याबद्दल माहिती दिली.

प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा व इंटरनेट ऑफ थिंग्जचा वापर वाढणार असून दैनंदिन जीवनातही इंटरनेटचा वापर वाढणार आहे. परिणामी,  ‌अनेकांचा खासगीपणा धोक्यात आला आहे. सायबर चोरांनी आतापासूनच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू केल्यामुळे येत्या काळात त्याविरुद्ध लढण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक असल्याचे मत या तज्ञांनी यावेळी व्यक्त केले.

ऑनलाईन जगात केलेल्या चुकांचे काय परिणाम होऊ शकतात हे सत्य घटनांवर आधारित उदाहरणे देऊन  विद्यार्थ्यांना समजावण्यात आले. सायबर कायद्यांविषयी माहिती देत तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करावा असे आवाहन या सत्रात मान्यवरांनी केले.

महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलिस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह म्हणाले की, इस्राईलचे मुंबईतील दूतावास आणि महाराष्ट्र सायबर यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थी नक्कीच तंत्रज्ञानाचा वापर अधिक जागरूकतेने आणि  आत्मविश्वासाने करतील. येणाऱ्या काळात सायबर क्राईमचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे.

महावाणिज्यदूत श्री. फिन्कलस्टन यांनी, इंटरनेटमुळे नागरिकांचे खासगी जीवन धोक्यात येत आहे. त्यामुळे सायबर विश्वातील चोऱ्या, हल्ल्यांविरुद्ध लढण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. स्मार्ट फोनच्या माध्यमातून इंटरनेटचा सुयोग्य वापरातून विद्यार्थ्यांनी सायबर चौकीदार बनून हा लढा लढावा, असे आवाहनही केले.

महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक बाळसिंग राजपूत म्हणाले, या कार्यक्रमाद्वारे आपण भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी तरुण पिढीला सक्षम करत आहोत. तरुणांमध्ये तंत्रज्ञानाचा जाबदारीने वापर कसा करावा याबद्दल जनजागृती होईल ज्याद्वारे घडणाऱ्या ऑनलाईन गुन्ह्यांना आळा घालता येईल.