नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी ७ संघटनेच्या सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी ‘बिल्ड बॅक बेटर वर्ल्ड’ हा नवा जागतिक उपक्रम हाती घेतला आहे. पायाभूत सुविधा अधिक बळकट करून देशांचा विकास, चीनच्या ‘ बेल्ट अँड रोड ’ प्रकल्पाला टक्कर देण्याची तयारी आणि एकूणच आपल्या सदस्य देशांना सर्व बाजूंनी अधिक बळकट करणे या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

कॉर्नवाल इथं नुकत्याच झालेल्या शिखर परिषदेत परस्परांमध्ये मूल्याधारित आणि पारदर्शी भागीदारी ठेवण्याचा निश्चय जी ७ च्या नेत्यांनी बोलून दाखवला. जी ७ संघटनेच्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन भविष्यातील अशा कोरोनासदृश महासाथी रोखण्यासाठी नवा आराखडा तयार करणार असल्याचं सांगितलं आहे, तसच कोरोना लस विकसित करण्यासाठी आणि त्यांना परवानगी मिळण्याकरिता लागणारा वेळ कमी करून पुढील १०० दिवसांच्या आत या गोष्टी पार पाडण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे.